निरा | विजय लकडे
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी संपूर्ण नियोजनबद्ध तयारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिली. पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आणि वाहतुकीच्या व्यवस्थेचे चोख नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी मंगळवारी (दि. २७) पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आळंदी ते नीरा दरम्यान पालखी विसावा आणि मुक्काम स्थळांची, तसेच महामार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नीरा येथील पालखी तळाचीही पाहणी केली.
या दौऱ्यात अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, पुरंदरचे प्रांताधिकारी वर्षा लांडगे, भोर-पूरंदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अँड. राजेंद्र उमाप, चोपदार राजाभाऊ रणदिवे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, एनएचआयएचे प्रकल्प संचालक संजय कदम, तहसीलदार विक्रम रजपूत, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, पुणे जिल्हा परिषद माजी सभापती दत्ताजी चव्हाण आणि विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज.
डुड्डी यांनी यावेळी सांगितले की, आळंदी ते नीरा दरम्यान पालखी सोहळ्याच्या मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी काही समस्या असून त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दिवेघाटातील रस्त्याचे काम पालखी सोहळ्यापूर्वी सुरळीतपणे पूर्ण करण्याच्या सूचना एनएचआयएला देण्यात आल्या आहेत.
कडक पोलिस बंदोबस्ताची तयारी
पालखी सोहळा काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले, "पालखी सोहळा काळात बंदोबस्तासाठी तीन हजाराहून अधिक पोलिस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी, होमगार्ड व राज्य राखीव दलाचे पथक तैनात असतील. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी चार विशेष पोलिस पथके कार्यरत असतील. या पथकांमध्ये महिला पोलिस अधिकारी, अंमलदार आणि साध्या गणवेशातील पोलिस कर्मचारी यांचा समावेश असेल. मुक्कामाच्या ठिकाणी पोलिस मदत केंद्र व फिरते पोलिस स्टेशन देखील कार्यरत असतील."
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज असून, भाविकांच्या सेवेसाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येणार आहे!
0 Comments